वणी टाईम्स न्युज : मोठ्या भावाचा कोर्टाचा दंड का भरला म्हणून मुलाने आपल्या बापाला लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी वडीलाच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी पुत्र लिंगा शालिक मडावी (28) रा. नरसाळा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी शालिक शामराव मडावी (48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान मुलगा लिंगा मडावी यास दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन तो नेहेमी कोणत्याही कारणाने त्याच्या सोबत भांडण करीत असतो. दिनांक 9 ऑक्टो. रोजी रात्री 9 वाजता लिंगा दारु पिऊन घरी आला व मोठा भाऊ राहुल मडावी याचा कोर्टाचा दंड तुम्ही का भरला, म्हणून वाद घातला. आरोपी मुलाने वडिलांना शिवीगाळ करीत लाकडी काठीने हातापायावर तसेच पाठीवर मारहाण केली.
तसेच आरोपी मुलाने जर तू मोठ्या भावाला परत पैसे दिले तर जिवानिशी ठार मारु अशी धमकी दिल्याचे फिर्यादी शालीक मडावी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपी लिंगा शालिक मडावी (28) रा. नरसाळा विरुद्ध कलम 115, 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला.