वणी टाईम्स न्युज: शहरातील प्रगती नगर येथील व्यावसायिक सुभाष डोरलीकर यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीमधील सातव्या आरोपीला एसडीपीओ पथकाने जेरबंद केले आहे. टोळीतील सहा जणांना पोलिसांनी घटनेनंतर अटक करून कारागृहात पाठवले. मात्र सातवा आरोपी हा मागील आठ महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण (36), राहणार रेल्वे स्टेशन जवळ बसमत जिल्हा हिंगोली असे जेरबंद केलेल्या दरोडेखोराचा नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 सप्टेंबर 2024 रोजी रात्री तब्बल सात दरोडेखोरानी प्रगती नगर येथील व्यवसायिक सुभाष डोरलीकर यांच्या घरावर हल्ला चढवला. मात्र घरातील सदस्य जागा झाल्यामुळे दरोडखोर पळून गेले. यवतमाळ स्थानिक गुन्हा शाखा पथकाने दरोडेखोरांच्या टोळीतील मुकिंदसिंग निक्कासिंग टाक व सावनसिंग मुकिंदसिंग टाक यांना जालना येथून ताब्यात घेतले होते. आरोपींना वणीत आणल्यानंतर विचारपूस केली असता वणी येथीलच एक महिला राणी विनोद ब्राह्मणे ही दरोड्याची मास्टर माईंड असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसाने मास्टर माईंड राणी उर्फ सरस्वती ब्राह्मणे, रा. हिराणी लेआऊट वणी सह मुर्कीदरसिंग निक्कासिंग टाक, सावनसिंग मुर्कीदरसिंग टाक दोन्ही रा. गुरुगोविंद नगर, जालना, समंदरसिंग ऊर्फ बबलुसिंग रामसिंग टाक रा. गोकुलनगर वणी, सतनामसिंग गुरुमुखसिंग रा. वसमत व अजयसिंग सुभाषसिंग चव्हाण रा. वसमत यांना अटक करुन कारागृहात पाठविले. मात्र टोळीतील सातवा आरोपी बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण हा मागील आठ महिन्यापासून फरार होता.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वानखेडे, इकबाल शेख, कॉन्स्टेबल वसीम शेख, अमोल नून्नेलवार यांनी केली.