वणी टाईम्स न्युज : राज्यातील सर्व नद्यांवर राज्य शासनाने रेती घाट चिन्हित केलेले असून त्या घाटांचा शासनाकडून दरवर्षी लिलाव केल्या जातो⁹. मात्र मागील दीड वर्षापासून लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. नेमकी हीच संधी साधून वणी तालुक्यात एका रेती माफियाने वर्धा नदी पात्रात स्वतःचे खाजगी रेती घाट तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
तालुक्यातील झोला गावालगत वर्धा नदीत तयार केलेल्या या रेती घाटातून रात्रीच्या काळोख्यात पोकलँड मशीनच्या साहाय्याने आतापर्यंत हजारो ब्रास रेती उपसा व चोरी करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी टाकलेल्या धाडी दरम्यान अवैध रेती घाटाचा हा प्रकार उघडकीस आला. नदी पात्रातून हजारो ब्रास रेतीचा उपसा केल्याने नदी पात्रात मोठे मोठे खड्डे तयार झाल्याचे पाहून स्वतः तहसीलदार दंग राहिले.
शासनाने लिलाव केलेल्या रेती घाटातून मंजुरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त वाळू उपसा करण्याचे प्रकार सर्रास चालतात. मात्र आता तर रेती माफियांनी चक्क खाजगी रेती घाट उघडून शासनाला आव्हान दिले आहे. या घाटातून दुसऱ्या कोणाला रेती काढण्याची परवानगी नव्हती. शनिवारी रात्री 3 वाजता जेव्हा तहसीलदार वर्धा नदीच्या पाटाळा पुलाखाली थाटलेल्या खाजगी रेती घाटावर पोहचले त्यावेळी उमेश बोढेकर नामक व्यक्ती हा ट्रक जवळ उभा होता. असे तहसीलदार धूळधर यांनी सांगितले.

कोण आहे उमेश बोढेकर ?
रात्री 3 वाजता रेती घाटावर मिळून आलेला व्यक्ती उमेश बोढेकर हा कोण आहे ? तो रात्री 3 वाजता नदी पात्रात का करीत होता. रेतीच्या तस्करीत त्याचा हात आहे का ? जप्तीतील ट्रक व मशीन उमेशच्या मालकीची आहे का ? याबाबत सखोल चौकशी व पोलीस तक्रार केल्यास रेती चोरीबाबत अनेक वास्तव बाहेर येण्याची शक्यता आहे.
रेती तस्करांना महसूल अधिकाऱ्यांचे पाठबळ ?
वणी उप विभागात पाटाळाच नव्हे तर वणी , मारेगाव व झरी जामणी तालुक्यात वर्धा व पैनगंगा नदीत अनेक ठिकाणी रेती चोरट्यांनी खाजगी रेती घाट तयार केले आहे. पोकलेन मशिनीच्या साहाय्याने झाडं झुडप्यातून नदी पर्यंत रस्ता तयार करून दिवसरात्र रेतीची चोरटी वाहतूक सुरू असताना मात्र संबंधित साज्याचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांना माहिती नसणे आश्चर्यकारक बाब आहे. त्यामुळे रेती तस्करांना महसूल अधिकाऱ्यांचे पाठबळ तर नाही ना ? अशीही खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.
कठोर कारवाई करणार
रेती घाटावर छापा टाकून एक पोकलेन मशीन व अंदाजे 5 ब्रास रेती भरलेला एक हायवा ट्रक जप्त केला आहे. जप्तीतील दोन्ही वाहनाची कोणाच्या नावाने नोंदणी आहे याबाबत वाहतूक शाखेकडून माहिती मागितली आहे. वाहन मालक तसेच उमेश बोढेकर यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
निखिल धुळधर – तहसीलदार व तालुका दंडाधिकारी, वणी