वणी टाईम्स न्युज : वणी विभागात रेती चोरटे चांगलेच मुजोर झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेती तस्करांनी हिंमत एवढी वाढली आहे की, ते आता अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. गोपनीय माहितीवरून महसूल पथकाने सापळा रचून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना पकडला. मात्र कार्यवाही सुरू असताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीमध्ये भरलेली 1 ब्रास रेती जमिनीवर खाली करून महसूल अधिकाऱ्यांसमोर ट्रॅक्टर पळवून नेला.
मारेगाव तालुक्यातील गोधनी येथे 22 मार्च रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडलेल्या या प्रकरणाबाबत गोधनी साजाचे ग्राम महसूल अधिकारी रत्नदीप शांताराम वाघमारे, रा. छोरीया लेआऊट गणेशपुर यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चालक अविनाश आत्राम रा. सुर्ला, ता. झरी तसेच ट्रॅक्टर मालक विरुद्ध कलम 303 (2) भा. न्या. स. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.