वणी टाईम्स न्युज : भरदिवसा विना परवाना रेती घेऊन येत असताना ट्रक महसूल पथकाच्या कचाट्यात सापडला. महसूल अधिकाऱ्यांनी तब्बल 7 ब्रास रेती भरलेला हायवा ट्रक जप्त केला. सदर कारवाई वणी वरोरा मार्गावर संविधान चौक येथे बुधवार 7 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान करण्यात आली.
वरोरा मार्गे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वरून नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांचे नेतृत्वात महसूल पथकाने संविधान चौक येथे ट्रॅप लावला. पथकाने सायंकाळी 4 वाजता वरोराकडून येणाऱ्या MH34-BG4047 क्रमांकाचे टाटा हायवा ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली आढळली. महसूल अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाला रॉयल्टी व वाहतूक पास बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तावेज मिळाले नाही.
सदर वाहनांमध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची खात्री पटल्याने पथकाने सदर रेती व हायवा ट्रक जप्त करुन रापनि डेपो आवारात उभा केला. परिवहन विभागाच्या संकेत स्थळावर सदर ट्रकची नोंदणी आकिब शकील अहमद याच्या नावाने आहे. सदर कार्यवाही नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, ग्रा. वि.अधिकारी सुनील उराडे, महसूल सहाय्यक अशोक चौधरी व महसूल कर्मचाऱ्यांनी केली.