वणी टाईम्स न्युज : प्रगतीनगर येथे दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेले 4 दरोडेखोरांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर दरोडा टाकण्याचा कट रचणारी मुख्य सूत्रधार राणी ब्राह्मणे हीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर घटनेत सहभागी आणखी दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. शिवाय आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रगतिनगर येथे वास्तव्यास व्यवसायिक सुभाष डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हा शाखा पथकाने जालना येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी रविवारी वणी येथील दीपक चौपाटी परिसरातून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. चारही आरोपींना न्यायालयाने 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिसांनी सोमवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून सतनामसिंग गुरुमुखसिंग चव्हाण (36) या आरोपीला अटक केली.
दरोड्यासाठी ठरला 50-50 चा फॉर्म्युला
व्यावसायिक सुभाष डोर्लीकर यांचे घरावर दरोडा टाकण्याचा कट गोकुळनगर वणी येथील राणी विनोद ब्राह्मणे हिने तिचे भाऊ समिंदरसिंग उर्फ बबलू सोबत मिळून रचला होता. त्यासाठी बबलू यांनी जालना, हिंगोली येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. सोबतच दरोड्यातून मिळालेले मुद्देमालाचा 50-50 हिस्सा घेण्याचेही ठरले. दुर्देवाने दरोड्याचा प्रयत्न फसला आणि मुख्य सूत्रधार राणीसह सर्व दरोडेखोरांना मुद्देमाल ऐवजी जेलची हवा खाण्याची वेळ आली.