वणी : जंगलात लपून छपून सुरु असलेले कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून 5 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरोडा आणि कायर पिंपरी शिवारात रविवार 26 नोव्हे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. शिरपूर पो.स्टे. हद्दीत तरोडा तसेच पिंपरी (कायर) जंगल शिवारात कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची हारजीतचा खेळ खेळत असल्याची माहिती ठाणेदार एपीआय संजय राठोड यांना मिळाली. माहितीवरून पोलिसांचे दोन पथक तयार करून दोन्ही ठिकाणी पाठविण्यात आले.
पोलिसांच्या एका पथकाने तरोडा येथे रेड करून दीपक तेलंग (25) व सुरेंद्र पिंपळकर (38) रा. यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी रोख 980 रुपये, काती 2 मृत कोंबडे जप्त केले. पिंपरी (कायर) जंगल शिवारात टाकलेल्या धाडीमध्ये पोलीस पथकाने शालिक तुराणकर (38), जावेद शेख (51) व संतोष टेकाम (35) ह्या तिघांना अटक केली. त्यांच्या कडून 1 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एपीआय संजय राठोड, सुनील दुबे, अनिल सुरपाम, सुगत दिवेकर, विनोद मोतेराव, विजय फुल्लुके, विनोद काकडे यांनी केली.
एका दिवसात लाखोंची उलाढाल
तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन पिक घरी येताच ठिकठिकाणी कोंबड बाजार सुरु होतात. काही ठिकाणी पोलिसांच्या अलिखित परवानगीने तर काही ठिकाणी लपून छपून चालणाऱ्या या बाजारात कोंबड्याच्या झुंजीवर पैज, झंडीमुंडी, मटका जुगार, दारू विक्रीच्या व्यवसायातून एका दिवसात लाखोंची उलाढाल होत असते. कोंबडबाजारचे शौकीन असलेले अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहे.