वणी टाईम्स न्युज : रस्त्याच्या बाजूला उभी करुन ठेवलेली पॉकलेन मशिनीच्या दोन बॅटऱ्यासह टूलकिट व 220 लिटर डिझेल चोरट्याने 16 सप्टेंबर रोजी रात्री चोरुन नेले. फिर्यादी पॉकलेन मशीन मालक विशाल मनोहर किन्हेकर (34) रा. मारेगाव यांनी घटनेबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
फिर्यादी यांच्या मालकीची पॉकलेन मशीन रस्त्याच्या कामाकरीता वणी मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलिया जवळ होती. 16 सप्टेंबर रोजी पॉकलेन ऑपरेटर नरेंद्र मडावी हा मशीन शिरगिरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या बाजूने उभी करून गावी गेला. रात्री 10.40 वाजता पॉकलेन मालक विशाल कीन्हेकर यांच्या मोबाईलवर मशीनची बॅटरी रीमुव्ह झाल्याचा मेसेज आला.
विशाल यांनी सकाळी पॉकलेन जवळ जाऊन पाहणी केली असता बॅटरी बॉक्सचे कुलूप तोडून दोन बॅटऱ्या किंमत 10 हजार, तपरिया कंपनीचे टूलकिट किंमत 10 हजार तसेच डिझेल टँकमधून 220 लिटर डिझेल किंमत 20 हजार असे एकूण 40 हजाराचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळले. फिर्यादी यांनी पॉकलेन ऑपरेटर नरेंद्र मडावी याला विचारणा केली असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.