जितेंद्र कोठारी, वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून 9 मे च्या रोजी रात्री बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी आढळली. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ म्हण प्रमाणे घडलेल्या या घटनेचा सुखरूप पटापेक्ष झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने ही सुटकेचा श्वास सोडला आहे. मुलीच्या आईने तिला शिक्षण सोडून मजुरी कामावर जाण्याचे सांगितले म्हणून रागाच्या भरात ती पहाटे उठून बाजूच्या गावात आपल्या मैत्रिणीकडे गेल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार मुलीच्या वडिलाचे 4 वर्षांपूर्वी निधन झाले. आई आणि एक लहान बहीण सोबत ती गावात राहते. तिची आई मोलमजुरी करून कुटुंब सांभाळत आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या आईने तिला शिक्षण सोडून मजुरी कामावर जाण्याची सक्ती केल्यामुळे ती संतापली होती. अशातच रागाच्या भरात 9 मे च्या पहाटे ती आईला व बहिणीला झोपेतच सोडून घरातून निघून गेली.
सकाळी उठल्यावर मुलगी घरात दिसून पडली नाही, तेव्हा तिच्या आईने सगळीकडे शोध घेतला. परंतु मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या आईने शिरपूर पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शोधाशोध केली असता मुलगी दुसऱ्या दिवशी कुरई गावात तिच्या मैत्रिणीच्या घरी आढळली.
शिरपूरचे ठाणेदार एपीआय माधव शिंदे यांनी मुलीला घरून पलायन करण्याचे कारण विचारले असता तिची आई तिला शिक्षण सोडून मजुरीवर जाण्याची सक्ती केल्यामुळे कोणालाही न सांगता घरून निघून गेल्याची कबुली दिली. एकूणच अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता झाल्यामुळे उद्भवलेल्या विविध चर्चेला विराम मिळाला आहे.