वणी टाईम्स न्युज : आई बाजार आणायला गेल्याची संधी साधून साडे सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरून पैसे, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे घेऊन बेपत्ता झाली. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात बुधवार 24 ऑक्टो. रोजी घडलेल्या या घटनेबाबत मुलीच्या आईने अज्ञात इसमाने तिच्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी महिलेला 2 मुली असून मोठी मुलगी 17 वर्ष 7 महिन्याची तर लहान मुलगी 9 वर्षाची आहे. मोठ्या मुलीने मागील 3 वर्षांपूर्वी शिक्षण सोडले असून ती घरकामात मदत करीत होती. महिला बुधवारी बाजारातून समान व भाजीपाला घेऊन परत घरी आली असता तिच्या लहान मुलीने सांगितले की ताई तुला पैसे देण्याकरिता बाजारात गेली आहे. त्यामुळे महिलेने परत बाजारात जाऊन मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. घरी आल्यावर महिलेला तिनं ठेवलेले पैसे, मुलीचा बॅग, कपडे आणि शैक्षणिक कागदपत्रे दिसून पडले नाही.
मुलीच्या शोधात महिलेने आपल्या नातेवाईकांना फोन करून विचारणा केली असता सर्वांनी ती आमच्याकडे आली नसल्याचे उत्तर दिले. शेवटी फिर्यादी आईने शिरपूर पोलीस स्टेशन गाठून कुणीतरी व्यक्तीने तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 137 BNS अन्वये गुन्हा दाखल केला.
शालेयस्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता
आईवडील अनेक कष्ट सहन करून आपल्या पाल्यांना मोठे करतात. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. मुलं मुली वयात आल्यानंतर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा पालकांना असते. मात्र ऐन उमेदीच्या काळात तरुण मुली पालकांच्या विश्वासाचं खून करून काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या व्यक्तीसाठी घर सोडून जाण्यात मागे पुढे पाहत नाही. या गंभीर समस्येबाबत विविध सामाजिक उपक्रम राबवून आणि शालेय स्तरावर मुला – मुलींमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.