वणी टाईम्स न्युज : तिचा विवाह सामाजिक रिती रिवाजाप्रमाणे वरोरा येथील अलिशान मंगल कार्यालयात पार पडला. नवऱ्यासोबत सुखी भविष्याची कामना करत ती सासुरवाडी तुकूम चंद्रपूर येथे गेली. नवीन वधूचा जसं स्वागत व्हायल पाहिजे, तसं सासरवडीत तिचाही रिवाजानुसार स्वागत करण्यात आला. पती, सासू आणि सासऱ्याचा तिच्यावर प्रेम पाहून ती भारावून गेली. मात्र एका महिन्यानंतर त्यांचे खरे रुप समोर आले असता तिला आपले नशीब फुटके असल्याचे कळले.
वणी शहरातील एका भागात वास्तव्यास रुपाली (बदललेले नाव) हिचा विवाह डिसेंबर 2022 मध्ये चंद्रपूर येथील स्वप्नील सोबत झाला. लग्नाच्या एका महिन्यानंतर पती स्वप्नील ‘मला तू आवडत नाही’ म्हणून रुपालीला टोमणे मारायचा. तसेच तुझ्या बायकोला घरचे काम करता येत नाही, काय बघून तू लग्न केलं, असं म्हणून सासू सासरे तिच्या पतीला भडकवत होते. त्यामुळे पती तिला शिवीगाळ व मारहाण करायचा. तसेच माहेरच्या लोकांनी लग्नात हुंडा दिला नाही, असं म्हणून सासू सासरे तिच्यासोबत भांडण करीत होते.
सप्टेंबर 2023 मध्ये रुपालीचा पती स्वप्नील तिला घेऊन पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेला. तिथं काही दिवस स्वप्नील यांनी खाजगी ट्युशन क्लास सुरु केली. परंतु तिथंही तिची नणंद घरातील सर्व कामे करायला लावायची. तसेच भावाला भडकावून मारहाण करायची. शेवटी डिसेंबर 2023 मध्ये ती पुणेहून परत चंद्रपूर येथे आली. 4 जानेवारी 2024 रोजी रुपालीच्या पतीने तिला माहेरी वणी येथे आणून सोडले.
पती तिला घ्यायला येईल अशी आशा बाळगून रुपाली काही दिवस माहेरी राहिली. मात्र बरेच दिवस उलटूनही स्वप्नील तिला नेण्यासाठी आला नाही. तिनं वारंवार फोन केले असता स्वप्नीलने आपल्या मोबाईलमध्ये रुपालीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. अखेर रुपाली हिने पती व सासरकडील लोकांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पती पत्नीचे वादाचा विषय असल्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरण महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा यांच्याकडे वर्ग केला.
महिला समुपदेशन केंद्रात दोघांमध्ये समेट न झाल्याने पीडित विवाहितेनी वणी पोलीस ठाण्यात पती स्वप्नील तसेच सासू, सासरे रा. तुकूम चंद्रपूर व विवाहित नणंदीविरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 34, 498 -A भादवि नुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
टिप: बातमी वणी पोलीस ठाण्यात दाखल FIR क्रमांक 0155 दिनांक 27.02.2025 वरुन प्रकाशित