वणी टाईम्स न्युज : आंतरजातीय सुनेला जेवणामध्ये फिनेल द्रव टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी विवाहितेचे पती, सासू, सासरे, आणि तीन नणंदाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विवाहित महिलेनी पती, सासू व सासरे हे माहेरून 1 लाख रुपये आणण्याचा तगादा, चारित्र्यावर संशय तसेच वारंवार जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी महिला (28) हिचे मारेगाव येथील सतीश श्रीधर सिडाम (31) सोबत 17 फेब्रुवारी 2022 रोजी जगदंबा देवी मंदिर केळापूर येथे आंतरजातीय विवाह पार पडले होते. लग्नानंतर सासरी नांदायला आलेली नववधू सोबत सर्वजण काही दिवस गोडगुलाबीने चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर तिला दुसऱ्या जातीची असल्यावरून सतत दुय्यम वागणूक मिळत होती. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत मारहाण केल्याची घटना घडल्या.
एवढंच नव्हे तर 7 मे 2024 रोजी फिर्यादी हिची तब्येत बरी नसल्याने तिची सासूने तिला जेवणाची ताट वाढली. जेवणात फिनेल सारखा वास येत असल्याने फिर्यादी हिने जेवण न करता ते अन्न मांजरीला खायला दिले. सदर जेवण भक्ष्य करताच मांजरीचा सर्वांसमोर तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर तिचे सासरे नामे श्रीधर सिडाम यांनी तिला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनी लावला आहे.
गैरअर्जदार श्रीधर सिडाम यांनी मी पत्रकार आहे, माझे कुणीही काही करु शकत नाही असं म्हणून सुनेचा हात धरून मारहाण करुन घराबाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. धक्कादायक म्हणजे सासरा तिची छेड काढत असल्याचा व मोबाईलवर व्हिडिओ पाठवत आल्याचा घणाघात फिर्यादी महिलेनी तक्रारीत केला आहे. पती, सासू, सासरे यांनी तिच्यावर अत्याचार करीत असताना तिची एक अविवाहित नणंद तसेच दोन विवाहित नणंदा त्यांना चिथावणी देत असल्याचा आरोपही तक्रारीत लावण्यात आला.
फिर्यादी हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सतीश श्रीधर सिडाम (33) , सासरे श्रीधर शामराव सिडाम (60), सासू ताराबाई श्रीधर सिडाम (55) तसेच इतर 3 विरुद्ध कलम 85, 352, 351 (2), 351 (3), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.