जितेंद्र कोठारी, वणी : खरिफ हंगाम सुरु होताच शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. मनपसंत वाण मिळण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड होत आहे. नेमकं याच गोष्टीचा फायदा घेऊन कमी दरात घरपोच बियाणं आणून देण्याची बतावणी करुन काही महाभाग शासनाने प्रतिबंधित केलेली बोगस बी. टी. कापूस बियाणे शेतकऱ्याच्या माथी मारत आहे. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने प्रतिबंधित बियाणांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून 1 लाख 23 हजाराचे बोगस बियाणांसह 8 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीवरुन एलसीबी पथकाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राळेगाव तालुक्यातील खैरी बस स्टॉप जवळ सापळा रचून मारुती ब्रेझा कार क्रमांक MH 49 AE 6196 कारमधून 1 लाख 5 हजार रुपयांचे 33 किग्रा. खुले कापूस बियाणे जप्त केले. पोलिसांनी कारमधील विलास नानाजी देवेवार (40) व अविनाश संतोषराव निकम (29) दोघ रा. सावित्री पिंपरी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ते बियाणे सागर अरुण पारलेवार, रा. कोठारी, ता. बल्लारशाह कडून आणल्याची कबुली दिली. त्यावरून तिन्ही आरोपी विरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच प्रमाणे दिनांक 27 मे रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीत कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवुन केलेल्या कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर (33) रा. वार्ड नं. 02 भालर ता. वणी ह.मु. पिंपरी कायर याचे कब्जातुन बलवान रिसर्च हयब्रिड कॉटन सिड 5G या अनाधिकृत कपाशी बियाणांच्या 15 पाकीटे किमंत 18 हजार रु. चे जप्त करुन पो.स्टे. शिरपुर येथे त्याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी सर्व स्था.गु.शा. यवतमाळ तसेच कृषी अधिकारी (जि.प. यवतमाळ ) राजेंद्र माळोदे, अमोल जोशी, प्रविण जाधव, कल्याण पाटील सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.