वणी टाईम्स न्युज : राज्यात प्रतिबंधित गोवंश तस्करी विरुध्द पोलीस विभागाने मोठी कारवाई करत कंटेनरमध्ये गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आणला. सोमवार 17 मार्च रोजी दुपारी नागपूर हैदराबाद महामार्गावर पांढरकवडा येथे स्थानिक गुन्हा शाखा पथकाने ही कारवाई करत कत्तलीसाठी जाणाऱ्या 60 गोवंश जनावरांना जीवनदान दिला. पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या 3 तस्करांना अटक केली आहे.
चक्क कंटेनर ट्रकमध्ये गोवंश तस्करीचा खात्रीलायक माहितीवरुन एलसीबी पथकाने पांढरकवडा हद्दीतील पिंपरी गावाजवळ सापळा रचला. माहितीप्रमाणे सकाळी 11 वाजता नागपूर कडून येणाऱ्या TS07 UE 5029 क्रमांकाच्या कंटेनरला पोलीस पथकाने थांबविले. ट्रकमधील 3 व्यक्तींना ताब्यात घेऊन कंटेनरची झडती घेतली असता त्यात 60 गोवंश जनावर निर्दयीपणे विना चाऱ्यापाणीची व्यवस्था असताना कोंबून आढळले. पोलिसांनी ताब्यातील इसमांना विचारपूस केली असता जनावर कत्तलीसाठी हैद्राबाद येथे नेत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी कंटेनर जप्त करून गोवंश जनावरांना माऊली गोरक्षण संस्था वणी यांचे सुपूर्द केले. तसेच आरोपी संतोष भरलाल लोधा (59), मशीद अली रशीद अली (28) व शाकीर अली अमानत अली (50) सर्व रा. जिल्हा राजगड (मध्यप्रदेश) यांना अटक करून पुढील कार्यवाहीसाठी पांढरकवडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांचे मार्गदर्शनात API अजय कुमार वाढवे, PSI धनराज हाके, पोलीस अमलदार सुनील खंडागले, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतीश फुके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.