वणी टाईम्स न्युज : गावातील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याची तक्रार केली, म्हणून महिला सरपंच व तिच्या पतीने उप सरपंचाला मारहाण केल्याचा गुन्हा मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वनोजादेवी गावाचे उप सरपंच प्रशांत भंडारी यांनी याबाबत सोमवार 16 सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी हा वनोजादेवी ग्राम पंचायतीचे उपसरपंच या पदावर आहे. गावातील सिमेंट रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांना व्हॉट्सॲप द्वारे तक्रार केली होती. दिनांक 15 सप्टेंबर रोजी फिर्यादी उप सरपंच हे विळा पाजून परत घराकडे जात असताना गावात सिमेंट रस्ता बांधकाम सुरू असल्याचे ठिकाणी गेले. तेव्हा माती मिश्रित रेतीचा वापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
निकृष्ट बांधकामाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करीत असताना गावातील सरपंच डिमलबाई गोवर्धन टोंगे व त्याचे पती गोवर्धन टोंगे त्या ठिकाणी आले व त्यांनी प्रशांत भंडारी याला शिवीगाळ करुन हाताबुक्क्यानी मारहाण केली. तसेच गोवर्धन टोंगे यांनी फिर्यादीच्या हातात असलेला विळा हिसकावून डाव्या हातावर मारुन जखमी केला. दरम्यान गावातील काही लोकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. फिर्यादी उप सरपंच प्रशांत प्रकाश भंडारी (43) रा. वनोजादेवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच व त्याच्या पतीदेववर कलम 152(2), 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला.