वणी टाईम्स न्युज :– मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धामणी गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव श्रीराम आत्माराम शिवरकर (56), रा. धामणी ता. मारेगाव असे आहे.
श्रीराम हे रोजंदारीवर मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजारी होते. त्यांच्यावर नागपूर तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीराम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, या घटनेचा पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर बारेकर करीत आहेत.