वणी : घुग्गुस येथून चोरट्या मार्गाने रेती घेऊन वणीकडे येणारा मिनी ट्रक वणी पोलिसांनी पकडला. घुग्गुस वणी मार्गावर लालगुडा चौफुली येथे शुक्रवार 12 जानेवारी रोजी पहाटे 5.30 वा. वणी पोलिसांनी ही कारवाई केली. सपोनि माधव शिंदे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार सहा. पो. नि. माधव शिंदे हे पोलीस पथकासह दीपक टाकीज ते लालगुडा चौपाटी परिसरात नाईट पेट्रोलिंग करीत होते. पहाटे 5.30 वाजता दरम्यान घुग्गुस कडून एक येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या एका मिनी ट्रकला पोलीस पथकाने थांबवून तपासणी केली असता त्यात रेती भरून दिसली. पोलिसांनी ट्रक चालकास रेती वाहतूक परवाना व रायल्टी बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.
ट्रक मध्ये भरलेली रेती चोरट्यामार्गाने विना परवाना वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून रेती 2 ब्रास किमत 15 हजार व ट्रक क्रमांक MH37 T 2944 किमत 6 लाख असे एकूण 6 लाख 15 हजारचा मुद्देमाल जप्त करून ट्रक वणी पोलीस स्टेशन येथे आणले. सपोनि माधव शिंदे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक लक्ष्मण उद्धव काळे (33) रा. पुनवट विरुद्ध कलम 379 व जमीन महसूल कायदा कलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.