वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेपेरा ते शेलू (खुर्द) मार्गावर अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करुन वाहतूक करीत असताना दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. शनिवार 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) आणि त्यातील रेती 2 ब्रास असे एकूण 12 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी दोन्ही ट्रॅक्टरचे मालक व चालक यांचे विरुध्द वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सखाराम सूर्यभान चिकटे (28),चेतन राजेन्द्र चिकटे (27), निलेश रमेश बेलुरकर (23) व अशोक विनोद दुमोरे (26) रा. नांदेपेरा असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सपोनि निलेश अपसुंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी सद्य निवडणूक कामात व्यस्त असल्याची संधी साधून तालुक्यात रेती चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.