वणी : जिल्ह्यातील 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 6 गुन्ह्यात पोलिसांना वाँटेड दोन आरोपींना वणी पोलिसांनी वर्धा येथून शिताफीने अटक केली. अनिल विनायक येमुलवार (22), व दिनेश रविंद्र मेश्राम (20) रा. खरबडा मोहल्ला वणी असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही गुन्हेगाराचे नाव आहे.
वणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी सुभाष धोंडुजी येवले रा. भालर वसाहत यांनी दिनांक 12 सप्टे. 2023 रोजी तक्रार नोंदविली होती. फिर्यादी हा आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहने दीपक टॉकीज ते लालगुडा मार्गाने जात असताना मारुती झेन कार मध्ये आलेल्या काही युवकांनी त्यांना व त्यांच्या मुलाला दगडाने मारहाण करुन मुलाचा 35 हजार किमतीचा मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार दिली होती.
सदर गुन्ह्यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली, परंतु मुख्य आरोपी अनिल येमुलवार आपल्या साथीदार दिनेश मेश्रामसह फरार झाला होता. आरोपी अनिल येमुलवार व दिनेश मेश्राम यांच्यावर वडगाव (जंगल), शिरपूर, मारेगाव व राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत अटक चुकवीत होते.
वरील गुन्ह्याचे तपास करताना ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांना आरोपी हे वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील पिंपळखुंटा गावात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार जाधव यांनी तत्काळ गुन्हा शोध पथकाला आरोपीला अटक कामी रवाना केले.
डिबी पथकाचे API माधव शिंदे, स. फौ. सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख यांनी आर्वी तालुक्यातील खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुंटा गावातून दोन्ही गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेऊन वणी पोलीस स्टेशन येथे आणले.