वणी टाईम्स न्युज : ‘ती’ माझी गर्लफ्रेंड आहे, तू तिच्यासोबत का बोलतो ? असं म्हणत मित्राने मारहाण करीत हातातील लोखंडी कडयाने वार करून त्याचे डोकं फोडले. मुकुटबन रोडवर हॉटेल ताज सेलिब्रेशन समोर काठेड ले आऊटमध्ये ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. फिर्यादी तरुणाने वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी युवकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी आणि आरोपी तरुण दोघं मित्र आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका मुलीसोबत फिर्यादीचे मित्राचे प्रेम संबंध होते. दोघांमध्ये वाद होऊन त्या मुलीने मागील एका महिन्यापूर्वी ब्रेकअप केले. त्यानंतर तिचे आणि फिर्यादी तरुणाचे सूत जुळले. त्यामुळे एक्स बॉयफ्रेंडचा राग अनावर झाला. ‘तू मेरी नही तो किसी ओर की भी नही होने दुंगा, असा विचार त्याच्या मनात आला.
तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी सायंकाळी काठेड ले आऊट मधून जात असताना आरोपी मित्र त्याच्या जवळ आला व ती माझी गर्लफ्रेंड आहे तू ‘तिच्या’ सोबत का बोलतो ? असं म्हणून थापड बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील लोखंडी कडा डोक्यावर मारुन त्याला जखमी केले. फिर्यादीचे वडील त्याला सोडविण्यास मध्ये आले असता त्यांच्या हाताच्या व पायाच्या बोटावर मार लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. पोलिसांनी आरोपी युवकावर कलम 323,324,504 नुसार गुन्हा दाखल केला.