वणी टाईम्स न्युज : अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या उच्चशिक्षित युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवार 8 मे रोजी सकाळी मारेगाव येथे उघडकीस आली. दिक्षा केशव उमरे (27) रा. वार्ड क्रमांक 16 मारेगाव असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दिक्षा उमरे हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथील एका खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली होती. तिचे विवाहाचे बोलणे सुरू होते आणि यंदा तिचे लग्न होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र काही कारणास्तव हे लग्न मोडले. त्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने ती सतत अस्वस्थ राहू लागली होती.
याच नैराश्यातून दिक्षाने आज पहाटेच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी आई-वडील हॉलमध्ये झोपलेले होते. सकाळी उठल्यावर बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तो तोडण्यात आला. त्यावेळी दिक्षाचा मृतदेह लटकलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले व मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
मृतक दिक्षाच्या पश्चात आई, वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. एक सुसंस्कृत आणि भविष्याच्या वाटेवर असलेल्या युवतीने घेतलेले हे टोकाचे पाऊल दुर्दैवी ठरत असून समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरुकतेची गरज अधोरेखित करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.