वणी टाईम्स न्युज : ट्रक अपघात विम्याचा लाभ मिळावा म्हणून विमा कंपनीला खोटी माहिती देऊन स्वतः आरोपी होणे एका ट्रक मालकाला चांगलेच महागात पडले. फिर्यादी पोलीस निरीक्षक विजया श्रीकृष्ण अलोने (गुन्हे अन्वेषण विभाग, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक मालकासह तिघांवर पाटण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अविनाश रामकृष्ण तायडे, प्रमोद आनंदराव तायडे दोघं रा. जामठी (बु.), तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला व ट्रक मालक मोहम्मद आदिल मो. इस्माईल, रा. मोर्शी, जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार परतवाडा येथून संत्रा फळ भरुन बंगलोर साठी निघालेला आयशर ट्रक क्रमांक MH27 X 6744 दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी बोरी पाटण मार्गावर दाभा गावाजवळ पलटी झाला होता. घटनेच्या वेळी ट्रक मालक मोहम्मद आदिल मो. इस्माईल हा स्वतः गाडी चालवीत होता अशी तक्रार पाटण पोलीस ठाण्यात देण्यात आली. ट्रक मध्ये बसलेले इतर अविनाश रामकृष्ण तायडे, प्रमोद आनंदराव तायडे व अब्दुल वहाब अब्दुल सत्तार पैकी प्रमोद तायडे हा गंभीर जखमी झाला.
ट्रक मालक मोहम्मद आदिल मो. इस्माईल यांनी ट्रक अपघात नुकसान, दवाखाना खर्च मिळावा म्हणून वाहन विमा कंपनीकडे दावा दाखल केला. मात्र कंपनीने सदर अपघात बद्दल माहिती काढली असता घटनेच्या वेळी ट्रक अविनाश तायडे हा चालवीत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरुन विमा कंपनीने जुलै 2023 मध्ये गुन्हा पडताळणी करिता गुन्हे अन्वेषण विभाग, अकोला कडे अर्ज केले. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या पडताळणी मध्ये घटनेच्या वेळी आयशर ट्रक चालक अविनाश तायडे यांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अपघातास कारणीभूत असल्याचे तसेच त्याच्या कडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने गाडी मालक मो. आदिल मो. इस्माईल सोबत कट कारस्थान रचून खोटी माहिती दिली. इन्शुरन्स व दवाखाना खर्च मिळावा म्हणून गाडी मालक मो. आदिल मो. इस्माईल हा स्वतः आरोपी झाला. तसेच अपघातग्रस्त ट्रकचे आरटीओ परीक्षण आवश्यक असताना निरीक्षण पूर्वीच ट्रक घेऊ गेला.
सदर घटनेचा तपास करून आरोपी अविनाश रामकृष्ण तायडे (ट्रक चालक), प्रमोद आनंदराव तायडे (फिर्यादी व जखमी) तसेच ट्रक मालक मोहम्मद आदिल मो. इस्माईल विरुद्ध मोटर वाहन अधिनियम कलम 177, 134(B), 130(1), तसेच कलम 34, 338, 279, 203, 201, 120(B) आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.