वणी टाईम्स न्युज : शहरातील बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभात, दवाखान्यात किंवा कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर पडले की हमखास घरफोडी होणार. असा प्रकार वणी शहरात पाहायला मिळत आहे. साधनकरवाडी येथे झालेल्या घरफोडीचा उलगडा होत नाही तर, शहरालगत चिखलगाव येथील साफल्य नगरीत चोरट्यांनी डाव साधला. चोरट्यांनी घरातील 50 हजार रुपये रोखसह 56 हजाराचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
फिर्यादी भारत वसंतराव ठाकरे (47) रा. मांगुळकर लेआऊट, चिखलगाव हे 15 फेब्रुवारी रोजी उपचारासाठी सहकुटुंब चंद्रपूर येथे गेले होते. 23 फेब्रुवारी रोजी ठाकरे परत आले असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी आलमारीमध्ये ठेवलेले 50 हजार रोख, सोन्याचे 6 ग्रॅमचे कानातले, 3 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रामचा सोन्याचा गोप व चांदीची 7 ग्रॅमची चाळ असे एकूण 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे आढळले.
घरफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी यवतमाळ येथून डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट चमूला पाचारण करुन घटनास्थळ पंचनामा केला. फिर्यादी भारत वसंतराव ठाकरे (47) यांच्या फिर्यादवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 331(3), 331(4), 305 (a) BNS नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय निलेश अपसुंदे करीत आहे.