जितेंद्र कोठारी, वणी : गोवंश जनावरांना कत्तलीकरिता तेलंगाना राज्यात नेत असल्याची गोपनीय माहितीवरून शिरपूर पोलिसांनी सैदाबाद शेत शिवारात छापा मारून दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबून असलेले 8 गोवंश बैलांची सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून चारचाकी वाहन, दुचाकी तसेच 8 बैल असे एकूण 4 लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. बालाजी हरिदास मोहितकर (44) व गौरव बालाजी मोहितकर (23) रा. रुईकोट ता. झरी असे आरोपीचे नाव आहे.
कायर बीट अंतर्गत सैदाबाद शिवारातून एका बोलेरो वाहनात गोवंश जनावर कत्तलीकरिता तेलंगाना येथे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बुधवंत यांनी पोलीस स्टाफसह शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सैदाबाद शेत शिवारात पोहचले. त्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो मॅक्स क्रमांक MH-29-BE-6812 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात 8 बैल अत्यंत क्रूरतेने आखूड दोरीने दाटीवाटीने बांधून दिसले.
पोलिसांनी वाहनात बसून असलेल्या दोन इसमांना विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव बालाजी हरिदास मोहितकर व गौरव बालाजी मोहितकर असे सांगितले. तसेच वाहनातील जनावर कत्त्लीकारिता आदिलाबाद येथे नेत असल्याची कबुली दिली. कबुली वरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी बोलेरो मॅक्स वाहन किमत 3 लाख 50 हजार, एक दुचाकी किमत 40 हजार तसेच सुटका करण्यात आलेले 8 बैल किमत 98 हजार असे एकूण 4 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची चारापाणीची व्यवस्था व सुरक्षितते करिता गुरु गणेश गौशाला रासा यांचे स्वाधीन करण्यात आले.
शिरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), सहकलम 9, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (1)(c), 11 (1)(d), 11 (1)(g) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 नुसार गुन्हा दाखल केला आहे.