वणी टाईम्स न्युज : वणी येथे उघडकीस आलेले गोवंश कत्तल प्रकरणाची शाई वाळत नाही तर शुक्रवारी पांढरकवडा येथे शेकडो गोवंशाचे अवशेष आढळले. एकाद्या सिनेमाचे पार्ट -2 प्रमाणे पांढरकवडा येथेही नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर झाडं झुडपात अतिक्रमण करुन बनविलेल्या पाच खोल्यांमध्ये गोवंशाचे अवशेष जमा करून ठेवण्यात आले होते. गोवंश कत्तलीची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने भिंती फोडून अवशेष बाहेर काढले.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 9 वाजता दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी पहापळ मार्गावर दुचाकीवर पोत्यात गोमांस घेऊन जाताना शेख युसुफ शेख अयुब कुरैशी व शेख अबू बकर अब्दुल सलाम या दोघांकडून 18 किलो गोमांस जप्त केला. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता घरातून 15 की.ग्रा. गोमांस आढळला. पोलिसांनी दोघांना अधिक विचारपूस केली असता स्मशान भूमी जवळ झाडं झुडपात 8 खोल्यात शेकडो गोवंशाचे हाड व अवशेष पोलिसांना सापडले.
पांढरकवडा पोलिसांनी सुद्धा वणी पोलिसांच्या पावलावर पाऊल टाकत जेसीबी मशिनीच्या सहाय्याने तात्काळ खोल्या उद्ध्वस्त करुन गोवंश अवशेष जमिनीत पुरले. वणी येथे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सखोल चौकशी करण्याऐवजी पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोवंश समितीच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पांढरकवडा पोलिसांनी सुद्धा पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे.
पांढरकवडा येथे उघडकीस आलेल्या गोवंश हत्येच्या घटनेची दखल गोसेवा आयोगाने घेतली असून लवकरच समिती पांढरकवडा येथे दौरा करुन वस्तुस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती आहे.