वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील 25 वर्षीय युवकाने शनिवारी आत्महत्या केल्याची घटना ताजा असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 23 वर्षीय शिक्षित व हुशार तरुणाने झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपविले. प्रीतम हुसेन आत्राम (23) रा. जळकापोड असे मृत तरुणाचे नाव आहे. तालुक्यात सतत घडणाऱ्या आत्महत्येच्या घटना चिंतेची बाब असून आरोग्य विभागाने गावोगावी मानसिक आरोग्य उपक्रम राबविण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रीतम आत्राम हा आपल्या वडीलांना शेती कामात हातभार लावत होता. सोबतच स्पर्धा परीक्षाची तयारी करत होता. प्रीतम हा गावात सर्वात जास्त शिक्षित व हुशार मुलगा होता. त्यांनी पोलीस व फॉरेस्टच्या भरती परीक्षेत भाग घेतला होता. शनिवार 17 मे रोजी दुपारी प्रीतम घराबाहेर निघाला होता. मात्र सायंकाळी 5 वाजता स्वतःच्या शेतात रोहिणीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. घटनेबाबत पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
मृतक तरुणाच्या मागे आईवडील व भाऊ असून प्रीतम यांनी काय कारणाने आत्महत्या केली याबाबत स्पष्ट झाले नाही. घटनेची तपास सहा. पो. निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिगांबर किनाके करीत आहे.
तालुक्यात मानसिक आरोग्य यंत्रणा कुचकामी
शैक्षणिक दडपण, बेरोजगारी, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण, प्रेमसंबंधातील अपयश, नैराश्य, व्यसनाधिनता अशा अनेक कारणांमुळे तरुण पिढी मानसिक आरोग्याच्या गर्तात जात आहेत. आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत, महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. सेवांमध्ये बाह्यरुग्ण तपासणी (OPD), समुपदेशन, औषधोपचार, आणि मानसिक आरोग्य शिबिरे यांचा समावेश आहे. मात्र मारेगाव तालुक्यात मानसिक आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.