राळेगाव : जागेच्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इसमाचा मृत्यू झाल्याचे कळताच मारेकरी गावातून फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हा शाखा पथकाने आरोपीचा मागोवा घेत त्याला जोडमोहा परिसरात सोनखासच्या जंगलातून ताब्यात घेतला. विलास माणिक जांभूळकर रा. बंदर, ता. राळेगाव असे आरोपीचे नाव आहे. तर उकंडा शिवराम जांभूळकर रा. बंदर, ता. राळेगाव असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत बंदर गावातील उकंडा जांभूळकर आणि विलास जांभूळकर या शेजाऱ्याच्या जागेवरून वाद सुरु होता. 22 मार्च रोजी सकाळी शुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबात झालेला वाद विकोपाला जाऊन मारहाण पर्यंत पोहचला. मारहाणीत उकंडा जांभूळकर हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला यवतमाळ येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 23 मार्च रोजी त्याच्या मृत्यू झाला.
उकंडा जांभूळकर यांच्या मृत्यूस कारणीभूत विलास जांभूळकर विरुध्द राळेगाव पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. खुनातील गुन्ह्याचा आरोपी बाबत गोपनीय माहिती घेऊन स्था. गुन्हा शाखा पथकाने जोडमोह परिसरात सोनखासच्या जंगलात लपून बसलेल्या आरोपी विलास जांभूळकर (38) यास अटक करून राळेगाव पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, राळेगाव पो. स्टे चे ठाणेदार पो. नि. रामकृष्ण जाधव यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस ठाणे राळेगांव येथील पो. अमलदार रत्नपाल मोवाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.