वणी टाईम्स न्युज : मागील काही काळापासून शहरात तरुण तसेच अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील जत्रा रोड भागात प्रेमनगर वस्तीत सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका 26 वर्षीय तरुणाला वणी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून 13 सेमी लांब धारदार चाकू तसेच एक मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही डीबी शाखेतील PSI धीरज गुल्हाने, वसीम शेख, निरंजन, गजानन, मोनेश्वर यांनी पार पाडली.
मागील काही काळापासून शहरात भाईगिरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शहरातील सेवानगर, दामले फेल, गोकुळ नगर या भागात काही अल्पवयीन मुलांचे टोळके तयार झाल्याची चर्चा आहे. या टोळक्यांवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर यवतमाळ सारखी गुन्हेगारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.