सुशील ओझा, झरी : तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असून मागील 4 दिवसात 3 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपविली. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 19 डिसे. रोजी उघडकीस आली. बाबाराव विठ्ठल डोहे (53) रा. डोंगरगाव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतकरी बाबाराव यांच्याकडे आठ एकर शेती आहे. मंगळवारी सायंकाळी बाबाराव याची पत्नी शेतातून परत आली असता त्याला त्याचा पति जमिनीवर निपचित पडलेला दिसला. बाबाराव याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला मुकुटबन येथील प्राथ. आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतक बाबाराव यांच्यावर बँकेचे तसेच खाजगी कर्ज असल्याची माहिती मिळत आहे. मृतक बाबाराव याच्या मागे पत्नी व 3 मुले असे आप्त परिवार आहे. त्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल का उचलेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुकुटबन पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे .सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप जाधव करीत आहे.