वणी टाईम्स न्युज : अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपून असताना वाईट उद्देशाने घरात घुसून विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राहुल बंडूजी नंदुरकर रा. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत जुलै 2018 मध्ये ही घटना घडली होती.
पीडितेने दिलेल्या जबानी रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध भांदविचे कलम 452, 354, 354- A व सहकलम बाललैंगिक अत्याचार पासुन बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 अन्वये व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदया अंतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करुन विशेष अति. सत्र न्यायालय पांढरकवडा येथे दोषारोप पत्र दाखल केले. अभियोग पक्षातर्फे सदरहु खटल्यात सहा. अभियोक्ता केळापुर ऍड. रमेश. डी. मोरे यांनी एकुण 7 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची आई, यांची साक्ष महत्वाची ठरली.
अभियोग पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे व युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी नामे राहुल बंडुजी नंदुरकर, यास भादविचे कलम 452 मध्ये 2 वर्ष सश्रम कारावास व कलम 354 मध्ये 2 वर्ष सश्रम कारावास व दोन्ही गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिन्याचा अतिरीक्त साधा कारावास तसेच बाल लैंगिक अत्याचार पासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 मध्ये 3 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली. वरील सर्व शिक्षा एकत्रपणे भोगण्यासंबंधी तसेच दंडाच्या रकमेमधुन पिडीतेला रुपये 3 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
अभियोग पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता केळापुर रमेश डी. मोरे यांनी खटला चालविला. पैरवी अधिकारी म्हणुन सहा.पो.उप.नि दिपक गावंडे पो. स्टे. मारेगाव यांनी काम काज पाहिले. ऍड. पठाण यांनी आरोपीची बाजू मांडली.