वणी टाईम्स न्युज : घरगुती वादांमुळे कंटाळून घर सोडणे आणि प्रियकरासोबत पळून जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे वणी उपविभागातील पोलीस ठाण्यात हरविल्याची (मिसिंग केस)तक्रारी वाढल्या आहे. यात 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडे समोर आले आहे. जानेवारी 2025 मध्ये 29 महिला व मुली तर 6 पुरुष व मुलं हरविल्याची तक्रार वणी, मारेगाव, शिरपूर व मुकुटबन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. यात सर्वात जास्त 21 तक्रारीची नोंद वणी पोलीस ठाण्यात आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर अपलोड माहितीनुसार 1 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत वणी पोलीस स्टेशनमध्ये 18 महिला व 3 पुरुष हरविल्याची नोंद आहे. त्यात 18 ते 25 वर्ष वयाची 13 युवती व महिला तर 26 ते 40 वर्ष वयाची 5 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यानंतर मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 7 महिला व 2 पुरुष मिसिंग असल्याची नोंद आहे. यामध्ये 26 ते 45 वर्षाची 4 महिला व 18 ते 20 वर्षाची 3 मुलीचा समावेश आहे. शिरपूर पोलीस ठाण्यात 18 ते 32 वर्ष वयाची 3 महिला तर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये 1 पुरुष व 1 महिला हरविल्याची तक्रार दाखल आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रेमाच्या आमिषाला बळी पडून अल्पवयीन व सज्ञान मुलींसह विवाहित महिला घरातून पलायन करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. कौटुंबिक वाद, प्रताडना, कर्ज आणि मानसिक आजारामुळे काही व्यक्ती घरून निघून जातात. हरविलेल्यापैकी काही व्यक्ती स्वतःहून परत येतात. तर काहींना शोधण्यात पोलिसांना यश येते. मात्र प्रेम प्रकरणातून पलायन केलेल्या बहुसंख्य मुली लग्न करून किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये इतर राज्यात निघून जातात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड होते.