वणी टाईम्स न्युज : भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनावर आदळल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. वणी नांदेपेरा मार्गावर लायन्स शाळेच्या समोर प्रसाद हॉटेल समोर हा भीषण अपघात सोमवारी रात्री 11 वाजता दरम्यान घडला. आनंद विजय नक्षिने (26) रा. वांजरी तालुका वणी असे या अपघातात मृत तरुणाचा नाव आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविताना हा अपघात घडल्याचे बोलले जाते.
प्राप्त माहितीनुसार वांजरी येथील आनंद नक्षीने हा काम आटोपून आपल्या पल्सर दुचाकीने रात्री 11 वाजता गावाकडे निघाला होता. दरम्यान नांदेपेरा चौरस्ताकडून शहराकडे येणारी एका क्रेटा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवर आनंद नाक्षिने हा रस्त्यावर पडल्याने डोक्यावर मार लागून जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातात मृत आनंद नक्षीने याच्या आईचे एका वर्षांपूर्वी निधन झाले असून वडिलांचा आधार असलेल्या एकुलत्या मुलाच्या अपघाती मृत्यूने वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.