वणी टाईम्स न्युज : वणी नांदेपेरा मार्गावर प्रवासी घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी झाला. शनिवार 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बामर्डा गावाजवळ घडलेल्या या अपघातात एक प्रवासी महिला जागीच ठार झाली. तर ऑटोमध्ये बसलेल्या इतर 5 ते 6 महिला जखमी झाल्याची माहिती आहे. शोभा पतरु दारुणकर (67) रा. वनोजा असे या अपघातात मृत महिलेचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वनोजा येथील एका कुटुंबाने खैरी (वडकी) येथे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी वनोजा येथील 5-6 महिला वनोजा येथीलच प्रशांत बोढे यांच्या मालकीचे तीनचाकी ऑटोमध्ये खैरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान मार्डी येथून काही अंतरावर बामर्डा गावाजवळ भरधाव ऑटो पलटी झाला. यात ऑटोच्या खाली दबून शोभा दारुणकर हिचा मृत्यू झाला.
अपघात घडताच ऑटो चालक ऑटो घेऊन तिथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतक व जखमी महिलाना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालयात मृत महिलेच्या शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. फरार ऑटो चालकाचा पोलीस शोध घेत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात..!
नांदेपेरा ते मार्डी मार्गावर डांबरी रस्ता अनेक ठिकाणी दबला आहे. तर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे झाले आहे. बामर्डा गावाजवळ एका बाजूने दबलेल्या रस्त्यामुळे ऑटो पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शियानी सांगितले. या मार्गावर जड वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना दिवसरात्र ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. त्यामुळे नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.