वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस ठाणे मागील काही महिन्यांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चोरी, दरोडासह इतर गुन्ह्यांवर आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या या पोलीस ठाण्यात आणखी एक धक्कादायक प्रताप उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यात मर्जीतील दोन कर्मचाऱ्यांनी चक्क लाखों रुपयांच्या मटका पट्टीचा उतारा घेऊन मटका संचालकाला तब्बल 35 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप होत आहे. मटका चालविणाऱ्या अल्ताफ नावाचा व्यक्ती आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेली व्हॉट्सॲप चॅटिंग शहरात वेगाने व्हायरल होत आहे.
उल्लेखनीय आहे की मटका व्यवसायाबाबत वणी शहराचे नाव राज्यातच नव्हे तर परराज्यात सुद्धा गाजलेला आहे. मटका पट्टी व्यवसायातून शहरात दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून जुगारी येथे मटका लावण्यासाठी येतात. याच कारणाने वणी पोलीस ठाण्याची ओळख मलाईदार (क्रीम) पोलीस स्टेशन म्हणून आहे. वणी पोलीस ठाण्यात पोस्टिंगसाठी अधिकारी आणि कर्मचारी लाखों रुपये खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाही.
अवैध व्यावसायिकांसोबत पोलिसांचे मधुर संबंध कोणापासून लपलेले नाही. काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध धंद्यात पार्टनरशिप असल्याचेही उघड झाले आहे. अशातच वणी पोलीस स्टेशनमधील या दोन मटका बहाद्दर कर्मचाऱ्यांने मटका संचालकांची फसवणूक केल्याची व व्हॉट्सॲप चॅटिंगची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यातील एक कर्मचाऱ्यावर यापूर्वीही निलंबनाची कार्यवाही झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात कमाई देणारा बीट मिळविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आपसी कुरघोडी सुरु असून त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.