वणी टाईम्स न्युज : अवैध दारु विक्री पकडायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दारु विक्रेत्या दोन युवकांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. रविवार 26 जानेवारी रोजी दुपारी ब्राह्मणी फाटा परिसरात घडलेल्या या घटनेबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल मो.वसीम मो. अकबर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रीतिक अनिल जेंगटे (25) रा. पंचशील नगर वणी व गणेश तुकाराम चहारे (36) रा. विवेकानंद सोसायटी वणी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने सर्व देशी व विदेशी दारूची दुकाने असल्याने अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे लक्ष होते. ब्राह्मणी फाटा येथे फ्रेंड्स चायनीज सेंटर जवळ दोन युवक अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल मो. वसीम व हेड कॉन्स्टेबल विकास धडसे यांना मिळाली. माहितीवरुन सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दोन युवक एक काळया रंगाच्या बॅगमध्ये देशी दारूच्या शिश्या ठेवून दारु विक्री करीत होते.
पोलिसांनी पंचासह सदर ठिकाणी जाऊन युवकांना बॅगमध्ये काय आहे ? अशी विचारणा केली असता त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. यात पोलीस कॉन्स्टेबल मो. वसीम यांच्या शर्टचे बटण तुटले. पोलिसांनी बळजबरीने बॅगची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या 90 मिलीच्या 20 शिशी आढळली. आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये चालण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी पोलीस जीप बोलावून सौम्य बळाचा वापर करून आरोपी युवकांना जीपमध्ये बसवून ठाण्यात आणले.
पोलिस ठाण्यात आरोपी रितिक अनिल जेंगटे व गणेश तुकाराम चहारे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई ), 85 (1) तसेच शासकीय कामात अडथळा व कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.