सुशील ओझा, मुकुटबन : खरीप हंगामाला सुरूवात झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी होत आहे. नेमकं याच गोष्टीचा फायदा घेऊन काही एजंट राज्यात प्रतिबंधित असलेली चोर बीटी कापूस बियाणं गुजरात, आंध्रप्रदेश व तेलंगणा येथून तस्करी करून शेतकऱ्यांना परस्पर विक्री करीत आहे. अशातच झरीजामणी पांढरकवडा मार्गावर पंचायत समिती कर्मचारी वसाहत जवळ एक इसम भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणं विकत असल्याची गुप्त माहिती झरीजामणी पंचायत समितीचे प्रभारी कृषी अधिकारी यांना शुक्रवार 24 मे रोजी मिळाली होती.
माहितीवरून कृषी अधिकारी सुरेश गुलाबराव चव्हाण यांनी कृषी विकास अधिकारी, जि. प. यवतमाळ राजेंद्र माळोदे आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ कल्याण सखाराम पाटील यांना अवगत केले. तसेच स्था. गुन्हा शाखा यवतमाळ येथे संपर्क करून बियाणे कार्यवाहीस्तव पोलीस कर्मचारी मिळणे बाबत विनंती केली.
कृषी अधिकारी पथकाने पोलीस स्टाफसह खाजगी वाहन तसेच दुचाकी वाहनाने नमूद जागेवर सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतला. तरुणाकडे असलेली शोल्डर बॅगची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित कापूस बियाणांची कृष्णा गोल्ड 5G Premium Hybrid Cotton Seeds Variety No. असे लिहिलेले 23 पाकीट आढळले. ताब्यातील आरोपीच्या वयाबाबत आधारकार्ड वरुन चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
प्रतिबंधित कापूस बियाणांबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर माल संकल्प उर्फ दादू भोयर रा. कोसारा, ता. झरीजामणी कडून विक्री करिता आणल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीही त्यांनी त्याच्याकडून माल आणून विकल्याची कबुली दिली. पथकाने विधी संघर्षग्रस्त आरोपी कडून 23 पाकीट प्रतिबंधित बियाणं किंमत 34 हजार 500 रु. एक मोबाईल किंमत 12 हजार व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 1 लाख असे एकूण 1 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी सुरेश गुलाबराव चव्हाण कृषी अधिकारी (प्र.) पं. स. झरीजामणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात आरोपी संकल्प उर्फ दादू भोयर (20) रा. कोसारा, ता. झरीजामणी व विधी संघर्षग्रस्त बालक विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 6,8,12,15, बियाणांचे अधिनियम कलम 7,8,9,10,11, 12,13,14 तसेच कलम 34, 420 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही कृषी अधिकारी (प्र.) सुरेश गुलाबराव चव्हाण, स्थानिक गुन्हा शाखाचे एपीआय अमोल मुडे पो हवालदार योगेश डगवार, पोना निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोका रजनीकांत मडावी, यांनी पार पाडली.