वणी : मारेगाव येथून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका कारचा मारेगाव वणी मार्गावर निम्बाला जवळ भीषण अपघात झाला. बुधवार 24 जाने. रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात कार मधील एक व्यक्ती जागीच ठार झाला तर दोन महिला व दोन लहान मुलांसह 5 व्यक्ती गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी एक महिला तसेच पाच वर्षाची एक मुलगी व दीड वर्षाच्या मुलाला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार मारेगाव येथील वार्ड क्रमांक 17 मधील सैय्यद कुटुंब दवाखान्यात जाण्यासाठी आपल्या आर्टिगा कार क्रमांक MH13DE 7906 मध्ये चंद्रपूरकडे निघाले होते. त्यासाठी त्यांनी रोजंदारीवर एक चालक सोबत घेतला. परंतु चालकाला बाजूच्या सीटवर बसवून कार मालक नवाब सैय्यद हा स्वत गाडी चालवीत होता. कारमध्ये दोन महिला व दोन लहान मुलांसह सहाजण होते. मारेगाव येथून काही किलोमीटर अंतरावर निम्बाला गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव सिमेंट ट्रक क्रमांक MH34BG 1337 च्या चालकाने ओवरटेक करण्याच्या नादात त्यांच्या कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
अपघात झाल्याचे कळताच नागरिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. मात्र कार चालक व मालक शेख नवाज मुजफ्फर सैयद (26) हा जागीच ठार झाला. तर चालकाच्या बाजूला बसलेला कमर सैय्यद व मागील सीटवर बसलेले शेख नवाज यांची आई, वहिनी, पुतण्या आणि भाची हे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक महिला तसेच 5 वर्षाची मुलगी व दीड वर्षाच्या मुलाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. तर मुलाची आई व ड्रायव्हर याला वणी येथील एका खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. माहितीनुसार मृतक शेख नवाज यांचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्यांची मारेगाव येथे किराणा दुकान आहे. अपघातानंतर काही वेळ वणी मार्गावर वाहतूक जाम झाली होती.