वणी टाईम्स न्युज : शहर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले ठाणेदार गोपाल उंबरकर यांना चोरट्यांनी जोरदार सलामी दिली आहे. शहरातील साधनकर वाडी परिसरात एका घरातून चोरट्यांनी लाखों रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व तब्बल 4 ते 6 लाख रुपये रोख लंपास केले. सोमवार 4 जानेवारी रोजी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली. घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने डाव साधला. शहरात घरफोडीची ही मोठी घटना असल्याचे बोलले जाते.
प्राप्त माहितीनुसार साधनकरवाडी येथे वास्तव्यास असलेले विमा प्रतिनिधी प्रदीप चींडालिया 25 जानेवारी रोजी सहकुटुंब बंगळुरू येथे गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान घरात ठेवलेलं तब्बल 30 तोळ सोन्याचे दागिने, 10 किलो चांदी व 4 ते 5 लाख रोख मुद्देमाल लंपास केल्याची माहिती घरमालक प्रदीप चिंडालिया यांनी दिली. सोमवारी सकाळी घरातील आंगण साफ सफाईसाठी आलेल्या महिलेला स्वयंपाक खोलीचा दार उघडं दिसला. तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच प्रदीप चिंडालिया यांचा मुलगा नागपूरहून वणीला पोहचला. त्यांनी घरातील सामानाची पाहणी केली असता आलमारी मधील सोन्याचांदीचे दागिने तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेले 4 ते 6 लाख रुपये मिळून आले नाही. चोरीच्या घटनेबाबत त्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी यवतमाळ येथून फिंगर प्रिंट एक्स्पर्ट व डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण केले. फिर्यादी अक्षय प्रदीप चींडालिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.