वणी : शेतीचा फेरफार करण्यासाठी शेतकऱ्याकडून 4 हजार 500 रूपये लाच घेताना तलाठ्याला अँटी करप्शन ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. शालिक मारोती कनाके असे लाचखोर तलाठ्याचा नाव आहे. सदर कार्यवाही मारेगाव येथे मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आली. एसीबीच्या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मारेगाव महसूल विभाग अंतर्गत खैरगाव येथील तलाठी शलिक कनाके याच्याकडे चिंचमंडळ गावाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. चिंचमंडळ येथील एका शेतकऱ्याला त्यांच्या शेतीचा फेरफार करायचं होता. परंतु तलाठी कनाके यांनी फेरफार करण्यासाठी शेतकऱ्याकडे 5 हजार लाचेची मागणी केली.
तडजोडीनंतर आरोपी तलाठी 4 हजार 500 रुपये घेण्यास तयार झाला. परंतु शेतकऱ्याला लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी दोघांमधील झालेले मोबाईल संभाषण व लाचेची मागणी केल्याची खात्री करुन मंगळवारी मारेगाव येथे सापळा लावला.
नियोजित योजनेनुसार तक्रारदार हा रक्कम घेऊन मारेगाव येथील सुभाषनगर भागात तलाठ्याच्या भाड्याच्या खोलीवर गेला. तिथे आरोपीने पैसे स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या अधिकाऱ्यांनी आरोपी तलाठीला रंगेहाथ पकडले. बातमी लीहे पर्यंत मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी शालीक कनाके विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, संजय कांबळे, वसीम शेख, अतुल मते, सचिन भोयर, भागवत पाटील, सुरज मेश्राम, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने यांच्या पथकाने केली.