वणी टाईम्स न्युज : दुचाकीच्या सीटवर घाण असल्याचे सांगून भामट्याने बाईकच्या पेट्रोल टाकीच्या खिशात ठेवलेले 49 हजार रुपये व कागदपत्र असलेली पिशवी लांबविली. सदर घटना येथील बस स्थानक समोर बुधवार 16 एप्रिल रोजी दुपारी घडली. फिर्यादी नत्थु पांडुरंग गुंजेकर (48) रा. सोनापूर, ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी यांनी शेती औषध खरेदी करीत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 49 हजार रुपये काढले. पैसे, पासबुक, आधारकार्ड व पॅनकार्ड त्यांनी पिशवीत टाकून मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीवरील पाकिटात ठेवले. बस स्टॉप जवळ लक्ष्मी मेडिकल समोर एक अज्ञात इसमाने त्यांच्या मोटरसायकलच्या सीटवर घाण असल्याचे सांगून पुढे निघून गेला. फिर्यादी यांनी दुचाकीची सीट पाण्याने धुवून पुढे बाकडे पेट्रोल पंपासमोर बॅटरीच्या दुकानात डिस्टिल वॉटर आणायला गेला.
डिस्टिल वॉटर घेऊन परत दुचाकी जवळ आले असता मोटरसायकलच्या पाकिटात ठेवलेली पिशवी दिसून आली नाही. इकडे तिकडे शोध घेऊनही पिशवी मिळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकीच्या सीटवर घाण टाकून पिशवी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.