वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील सर्व रेती घाट बंद असताना काही घाटावरून मध्यरात्री रेती तस्करीचा खेळ सुरु असल्याचे शुक्रवारी उघड झाले. घाटावरून अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहितीवरुन महसूल पथकाने गुरुवारी मध्यरात्री अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून 3 हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने धाड टाकताच दोन ट्रक चालकांनी ट्रकमध्ये भरलेली रेती तिथेच खाली केले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी रेती भरलेला एक व दोन रिकामे ट्रक जप्त केले.
तालुक्यात रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथक स्थापन केलेले आहे. गुरुवारी नाईट पेट्रोलिंग करताना महसूल पथकाला अहेरी (बोरगाव) रेती घाटावर अवैधरीत्या रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाली. रेती उपसा बाबत मंडल अधिकारी देशपांडे यांनी तात्काळ नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना सूचना दिली. सूचनेवरून नायब तहसीलदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्री 1.30 वाजता अहेरी (बोरगाव) रेती घाटावर छापा टाकला.
महसूल अधिकाऱ्यांनी रेती घाटावर रेती भरलेला हायवा ट्रक क्रमांक MH40-BG 0198 मध्ये तब्बल 9 ब्रास रेती भरलेली आढळली. तर MH 40-CT 3742 आणि MH34 – BG 9064 क्रमांकाच्या ट्रक चालकांनी छापा पडताच ट्रक मध्ये भरलेली रेती जागेवरच खाली केली.
महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तिन्ही ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावले. सदर कार्यवाही उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, मोहितकर, इंगोले, गोहने यांनी केली.