वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यात अवैध रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला असता तहसीलदार निखिल धुळधर यांनी धडक कारवाई करत अवैध रेती उत्खनन करताना पोकलँड मशीन व रेती भरलेला हायवा ट्रक जप्त केला. रवीवारी पहाटे 3 वाजता दरम्यान वर्धा नदीच्या झोला घाटावर ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार यांनी धाड टाकताच एक तस्करांनी एक ट्रक पळवून नेला. तर एक हायवा व नदी पात्रातून रेती उपसा करताना पोकलँड मशीन महसूल अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडली.
वर्धा नदीलगत झोला गावाजवळ अवैधरीत्या घाट तयार करून रेती उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार निखिल धुळधर यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार धूळधर यांनी तलाठी अंकुश जाधव यांना सोबत घेऊन मध्यरात्री 1 वाजता एका खाजगी वाहनात वणी वरोरा मार्गावर पाटाळा पुलाजवळ पोहचले. तिथून नदीकाठाने पायी चालत रात्री 3 वाजता दरम्यान त्यांनी अवैध रेती उत्खनन करताना पोकलँड मशीन व ट्रक दिसले.
तहसीलदार रेती घाटावर पोहचले असता तिथे उमेश नावाचा एक व्यक्ती मौजूद होता. तहसीलदारांना पाहून एका ट्रक चालकाने तिथून ट्रक घेऊन पळ काढला. तर मशीन ऑपरेटर व दुसऱ्या ट्रक ने नदी मधून पळवाट काढत चंद्रपूर जिल्हा हद्दीत मशीन नेली. त्यानंतर तहसीलदार व अंकुश जाधव यांनी परत पाटाळा पुलाजवळ येऊन आपले वाहन झोला गावाच्या पांदण रस्त्यावरून नेत जेसीबी कंपनीची 140 पोकलँड मशीन व MH40 N6670 क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला. दरम्यान मशीन ऑपरेटर व ट्रक चालक तिथून पळून जाण्यास यशस्वी झाले.
तहसीलदार निखिल धुळधर यांनी इतर महसूल अधिकाऱ्यांना पाचारण करून मशीन व ट्रक सकाळी 6 वाजता तहसील कार्यालयात आणून उभे केले. माहितीनुसार तहसीलदारांनी धाड टाकलेल्या ठिकाणी वर्धा नदीतून अवैधरीत्या हजारो ब्रास रेती उपसा करण्यात आली आहे. जप्तीतील वाहनाची मालकी बाबत चौकशी करून पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी वणी टाईम्सशी बोलताना सांगितले.