वणी टाईम्स न्युज : राज्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा आणि पान मसाला उत्पादन, वाहतूक, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वणी तालुक्यात शासन आदेशाला हरताळ फासून तस्करीच्या माध्यमातून राजरोसपणे गुटखा, तंबाखूची विक्री सुरु आहे. गुटखा तस्कर आणि विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याकरिता अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाला मागील 2 वर्षापासून मुहूर्त गवसत नाही की, कार्यवाही करण्यास त्यांना इंटरेस्ट नाही ? हा प्रश्न पडला आहे.
गुटखा आणि सुगंधित तंबाखू निर्मिती, वितरण आणि विक्री यावर राज्य सरकारने निर्बंध घातल्यानंतर तस्कर परराज्यातून गुटखा आणून शहरात व खेडोपाड्यात थेट दुकानांमध्ये गुटखा पोहोच करतात, पण तो पोलिसांच्या नजरेत कधीच येत नाही. अन्न व औषध प्रशासन तर केवळ उदिष्टापुरत्या कारवाया करून थांबते, त्यामुळे विक्रेत्यांचे फावते. गुटखा तंबाखू तस्करी विरुद्ध कार्यवाही न होणे आणि विक्री सुरू ठेवण्यामागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे.
शहरात व ग्रामीण भागात किराणा दुकानातून प्रतिबंधित खर्रा सुपारी, मजा, इगल तंबाखू, विमल गुटखा, पान पराग, रजनीगंधा पान मसाला, अन्नी मिठी सुपारी सहज विक्री केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मकसुद हा तेलंगणा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश राज्यातून गुटखा, मजा, ईगल 108 सुगंधित तंबाखू तस्करीच्या मार्गाने संपूर्ण वणी उप विभागात पुरवठा करतो. शहरातील काही विशिष्ठ किराणा भांडार आणि प्रोव्हिजन स्टोअर्स मधून पान सेंटर चालकांना खर्रा सुपारी, तंबाखू, पान पराग, विमल, राजविलास, रजनीगंधा, खर्रा पन्नी विक्री केली जात आहे.
नुकतेच वणी येथे आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना संबोधित करतांना सांगितले होते की यांना सर्व काही माहिती असते. फक्त हाथ बांधलेले असतात. मग प्रश्न असा उपस्थित होतो की शालेय विद्यार्थी, युवा पिढी, लहान मुलं व्यसनाधीन आणि नशेच्या आहारी जात असताना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू विक्री विरुद्ध कार्यवाही करण्यास पोलिसांचे हात कुणी बांधले ? चंद्रपूर व वणी येथील गुटखा तस्करांना ‘राजकीय पाठबळ’ आहे की पोलिसांची ‘मोहमाया’ त्यांना कार्यवाही पासून परावृत्त करीत आहे ?
शाळा, महाविद्यालय परिसरातही गुटखा विक्री..!
शाळा, महाविद्यालयांपासून किमान 100 मीटर अंतरात सिगारेट, गुटखा आणि तंबाखूची विक्री करू नये, असा नियम आहे, मात्र शाळांच्या आसपास असलेल्या किराणा दुकानांमध्येही गुटखा विक्री सुरू असते. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बिस्किट, चॉकलेट विक्री करणारे विक्रेतेही छुप्या पद्धतीने गुटखा आणि तंबाखुची विक्री करतात. हा गंभीर प्रकार शाळा प्रशासनासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडूनही दुर्लक्षित केला जातो.