वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशन मधील ‘त्या’ पोलीस हवलदारावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी एका आदेशाद्वारे पोलीस हवलदार गजानन डोंगरे यास निलंबित केले आहे. शहरात दीपक चौपाटी परिसरात उघडकीस आलेले गोवंश कत्तलखाना तसेच पोलीस वर्दीत मद्यप्राशन करुन झोपलेल्या अवस्थेत व्हायरल फोटो प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. गोवंश हत्या प्रकरण चौकशीत हलगर्जीपणा करण्याचा आरोपावरून ठाणेदार अनिल बेहरानी यांची यापूर्वी 31 डिसेंबर रोजी उचलबांगडी करण्यात आली होती.
उल्लेखनीय आहे की शहरातील दीपक चौपाटी परिसरात 11 जानेवारी रोजी गाईचे कापलेले दोन मुंडके व शेकडो गोवंशाचे अवशेष सापडले होते. गोवंश हत्या प्रकरणी महाराष्ट्र गोवंश आयोग समितीने चौकशी नंतर दीपक चौपाटी परिसराचे बीट हवालदार व बीट इन्चार्ज यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल पोलीस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला होता. तेव्हापासून सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी हिंदू संघटना कडून केली जात होती. दरम्यान 30 जानेवारी रोजी पोलीस हवालदार गजानन डोंगरे हा ड्युटीवर असताना दारूच्या नशेत बेभान झोपलेल्या अवस्थेत फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सदर दोन्ही प्रकरणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ठाणेदार अनिल बेहरानी यांना पोलीस हेडक्वार्टर अटॅच केले, तर पोलीस खात्यातील शिस्त भंग करण्याचा आरोपाखाली पोलीस हवलदार गजानन डोंगरे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. याबाबत वणीचे ठाणेदार पो. नि. गोपाल उंबरकर यांना विचारणा केली असता त्यांनी पोलीस जमादारावर निलंबनाची कारवाईला दुजोरा दिला.