वणी टाईम्स न्युज : खाकी वर्दी घातलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची ‘झिंगाट’ अवस्थेतील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खाकीची लाज न बाळगता ‘तर्राट’ झालेला हा पोलीस कर्मचारी वणी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल असल्याचे सांगण्यात येते. दारूच्या नशेत खाकी वर्दी ‘ओली’ झाल्याचे भानही या पोलीस कर्मचाऱ्याला नसल्याचे व्हायरल फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. सिंधी कॉलोनी भागात एका बारचे समोर टिनाच्या खोलीत दारूच्या नशेत सोफ्यावर लोळलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचा काही लोकांनी मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ शूट केला. या घटनेमुळे वणी पोलीस ठाण्याचे लक्तरे वेशीवर टांगले आहे.
प्राप्त माहितीनुसार वरिष्ठांच्या मर्जीतल्या या पोलीस हवालदाराची गोवंश हत्या व अवशेष प्रकरणातही भूमिका समोर आली होती. मात्र वरिष्ठांचे अभय मिळाल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र आता खाकीलाच डाग लावणाऱ्या या पोलीस हवलदाराविरुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाणेदाराची सारवासारव…
व्हायरल फोटो बाबत वणीचे ठाणेदार अनिल बेहरानी यांना विचारणा केली असता, पोलीस जमादाराची तब्येत खराब झाली असेल, त्याला सन स्ट्रॉक आला असेल, फिट येऊ शकते. त्याला विचारपूस करुन आणि चौकशी करून सांगता येईल. असा उत्तर देऊन या गंभीर विषयावर त्यांनी सारवासारव केली. मात्र असं जर असेल तर त्यांनी कोणत्या दवाखान्यात उपचार घेतला ? याची शहानिशा पोलीस अधिकाऱ्यांनी करावी. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे रजेवर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सीसीटिव्ही तपासणीत होईल सत्य उघड..!
पोलीस कर्मचाऱ्याची झिंगाट अवस्थेतील फोटो एक दोन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. सिंधी कॉलनीतील सदर बारचे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केल्यास संपूर्ण सत्य उघड होईल. दारूच्या नशेत खाकी वर्दीवर डाग लावणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.