वणी : येथील रंगनाथ नगर भागात एका इसमाने आपल्या घरात पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. मारोती विठ्ठल ठावरी (47) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मारोती ठावरी आणि त्यांची पत्नी हे टेलरिंग व्यवसाय करीत होते. वर्ष 2019 पासून मारोतीच्या पोटात उद्भवलेल्या आजाराने मागील काही दिवसांपासून डोके वर काढले होते. सततच्या त्रासाने मारोती कंटाळून गेला होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या पत्नीला दुध आणण्यासाठी बाजूच्या दुकानात पाठविले. त्याची पत्नी दुध घेऊन परत आली असता मारोती पंख्यावर नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
त्याच्या पत्नीने आरडा ओरड केली असता शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. घटनेबाबत वणी पोलिसांना सूचना देण्यात आली असून मारोतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतक मारोती याच्यामागे पत्नी व दोन मुले आहे.