वणी : झटपट पैसे कमविण्याची हाव एका युवकाला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखुवून अज्ञात आरोपीने युवकाला लाखोंचा गंडा घातला. छोरीया लेऑउट गणेशपूर येथे 9 नोव्हें. ते. 13 नोव्हे. दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने ज्यादा परतावा आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली. पिडीत युवकाने यवतमाळ सायबर पोलिसांकडे तसेच वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादनुसार टेलीग्राम ॲपवर लिंक पाठविणारे तसेच अज्ञात बँक खातेधारक विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार भगवानदास सोनपाल सिंग (34) रा. कल्याणपुर पिनाहट, पो. कुक्तरी, जि. आगरा , उ.प्र. ह.मु. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, छोरीया ले ऑउट वणी हे खाजगी नोकरी करतात. दिनांक 9 नोव्हे. रोजी तक्रारदार यांच्या टेलिग्राम अप्सवर अज्ञात व्यक्तीने लिंक पाठवून टास्क पूर्ण केल्यास दुप्पट पैसे मिळणार, असा मेसेज पाठविला. तक्रारदार यांनी लिंक ओपन करून संबंधित खात्यात 23 हजार 28 रुपये ट्रान्सफर केले. थोड्याच वेळात त्याच्या खात्यात 45 हजार 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला.
दुप्पट रकम जमा झाल्यामुळे भगवानदास यांचा सदर व्यक्तीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी 11 नोव्हे. ते 13 नोव्हे. चा कालावधीत आरोपीने दिलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यात 5 लाख 40 हजार 804 आपल्या बँक खात्यातून ट्रान्सफर केले. मात्र त्यांच्या बँक अकाउंट मध्ये एकही रुपया परत जमा झाला नाही. ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे लक्षात येताच भगवानदास यांनी सायबर सेल कडे तक्रार केली. सायबर सेल कडून त्यांना 17 नोव्हे. रोजी त्यांचेकडून पाठविण्यात आलेले रकमेपैकी 1 लाख 52 हजार 598 रुपये होल्ड करण्यात आल्याचा संदेश आला. तक्रारदार भगवानदास सोनपाल सिंग यांनी 22 नोव्हे. रोजी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्द ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.