वणी : पिक विमाच्या मुद्द्यावर यवतमाळ येथे शिवसेना (उबाठा) यांनी केलेल्या उग्र आंदोलनानंतर मनसे सुद्धा आक्रमक झाली आहे. बुधवारी मनसे नेते राजू उंबरकर आणि मनसे कार्यकर्त्यांनी मारेगाव येथील रिलायन्स पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. पुर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मतदारसंघांतील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानाची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामेच झालेले नाही. यामुळें शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. याच मुद्द्याला घेतं उंबरकरानी आक्रमक पावित्रा घेतं या कार्यालयाला कुलूप ठोकून हा पीक विमा लवकरात लवकर द्यावा अन्यथा यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा सज्जड दम उंबरकर यांनी कंपनीला दिला.
वणी मतदारसंघाचा दौरा करत असताना मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची राजू उंबरकर समोर पिक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची तक्रार केली. अनेक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही संबंधित कंपनीकडून करण्यात आलेले नाही. तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 रुपये मोबदला जमा झाले. शेतकऱ्यांची व्यथा ऐकून राजू उंबरकर मारेगाव येथील रिलायंस पिक विमा कंपनीच्या कार्यालयात पोहचले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिक विमा बाबत जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम मिळावी यासाठी राजु उंबरकर यांनी आक्रमक पावित्रा घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरले. तर स्थानिक कार्यालयालातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसल्याने कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. पिक विम्याचे पंचनामे करून लवकरात लवकर मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.
बघा व्हिडीओ –