वणी टाईम्स न्युज : शहरातील नांदेपेरा मार्गावरील लक्ष्मीनगर येथे एका लष्करी जवानाच्या घरी धाडसी घरफोडीची घटना सोमवारी सकाळी 6 वाजता उघडकीस आली. चोरट्यांनी बंद घराच्या समोरील दाराची कडी तोडून कपाटातून तब्बल 5 तोळयाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले. चोरट्यांनी आजूबाजूचे तसेच घराच्या वरच्या माळ्यावर राहणारे किरायेदार यांच्या घराला बाहेरून कुंडी लावली. फिर्यादी लष्करी जवान रवींद्र बरडे यांची पत्नी सोनू रविंद्र बरडे (31) हिने याबाबत वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार रवींद्र बरडे हे मिलट्री सेवेत असून सद्य अरुणाचल प्रदेश येथे ड्युटीवर आहेत. लक्ष्मीनगर येथे त्यांचे घर असून त्यांच्या पत्नी सोनू बरडे व मुलं राहतात तर त्याचे आईवडील निंबाळा येथे राहतात. रविवारी भांदेवाडा येथे बरडे कुटुंबीयांचे स्वयंपाक असल्याने फिर्यादी सोनू बरडे भांदेवाडा येथे गेली होती. रात्री उशीर झाल्यामुळे ती निंबाळा येथे घरी थांबली. सकाळी त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरूंचा फोन आला की आमच्या घरचा दार बाहेरून कुणितरी लावला आहे.
फिर्यादी हिने समोरील घर मालकाना फोन करून भाडेकरूचे दार उघडायला सांगितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. शेजारील एका घराच्या सीसीटीव्ही मध्ये 3 चोरट्यांची हालचाली टिपली आहे. चोरट्यांनी घरातील पलंग, फ्रीज, किचनच्या आलमारी तसेच बेडरूम मधील कपाटातील सर्व साहित्य व कपडे फेकफाक केले. तसेच लाकडी कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याची गोफ 2, पोत 1, अंगठी 2 व कानातले 1 जोडी असे अंदाजे 5 तोळा सोन्याचे दागिने चोरुन नेले.
घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर, पोलीस उप निरीक्षक सुदाम आसोरे यांनी घटनास्थळ निरीक्षण केले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी यवतमाळ येथून फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण करण्यात आले आहे. शहरात सततच्या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.