वणी : तालुक्यातील पळसोनी येथील एका विवाहित युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार 27 मार्च रोजी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (25) असे मृतकाचे नाव आहे. लग्नाला अवघ्या अडीच वर्ष झाले असता तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार पळसोनी येथील शंकर भट हा वणी येथील एका दुकानात नोकरीवर आहे. नेहमप्रमाणे शंकर हा सकाळी कामावर गेला. तर त्याची पत्नी प्रणिता ही घरी एकटीच होती. दुपारी 3 वाजता दरम्यान शंकरची आई त्याच्या घराकडे गेली असता प्रणिता लोखंडी आड्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.
घटनेबाबत माहिती मिळताच शंकर घरी पोहचाला व गावकऱ्यांचा मदतीने प्रणिताचा मृतदेह खाली उतरविला. पळसोनी येथील पोलीस पाटील यांनी वणी पोलीस स्टेशन येथे फोन करून घटने संदर्भात कळविले. त्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.